Wednesday, January 7, 2009

लाखचं घर

लाखचं घर म्हणजे लाख रुपयांच घर नाही... लाख हे माझ्या आजोबांच्या (आबांच्या) गावाचं नाव. 'लाख' - यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातलं, दिग्रसपासून जवळ-जवळ १५-२० किमी अंतरावर असलेलं एक खेडेगाव. आबा मी लहान असतानाच वारल्याने या घराशी माझा जास्त संबंध आलाच नाही, त्यामुळे खूप आठवणी आहेत असं म्हणू शकत नाही. पण तरीही या घराचं माझ्याशी असलेलं नातं वेगळंच आहे... कुठंतरी खोल खोल रुजलेलं! माझे काका दिग्रसला राहतात त्यामुळे आम्ही सगळे (भावंडं) सुट्या लागल्या की काकाच्या घरीच जास्त राहायचो. आणि मग एखाद्या दिवशी काका आपल्या गाडीतून लाखच्या घरी घेऊन जायचे; किंवा मग बाबा/काका आम्ही सगळे लाखला येणार आहोत असा निरोप पाठवायचे. तसंही त्या दिवसात, आणि तेही आपल्याच आजीच्या (मायच्या) घरी जायला निरोप पाठवायची गरज नसायची. पण सुरवातीच्या काळात महामंडळाची बस अगदी गावापर्यंत जात नसे. मग आम्ही बसने जाणार असलो की आधीच निरोप पाठवायला लागायचा, जेणेकरून कोणीतरी गडीमाणूस (सहसा बाबुलाल दादा किंवा श्रावण दादा) बैलगाडी घेऊन फाट्यावर यायचा.

फाट्यापासून लाख जवळ जवळ २-३ किमी अंतरावर असेल. आम्ही फाट्यावर उतरताच बाबुलाल दादा "काय मंग बालू (बाला/बालू/बाल्या हे माझं टोपण नाव) कवा आले दिग्रसले?" अशी विचारपूस करतच आपलं सामान स्वतःच्या हातात घेऊन बैलगाडीत ठेवत असे. आम्ही सगळे बैलगाडीत बसलो की मग रमत गमत, दोन्ही बाजूला पसरलेल्या शेतातून नजर फिरवत घराकडे जात असू. कधी कधी बाबुलाल दादा त्याच्या बरोबर बैलगाडी चालवायला द्यायचा (म्हणजे हातात फक्त दोर पकडायला द्यायचा). त्या खडकाळ रस्त्यावर बैलगाडी चालताना खूप धूळ उडायची, पण त्यावेळी त्यातही गंमत वाटायची. गावात शिरतानाच उजव्या बाजूला पाण्याच्या मोठ्ठा हौद होता (त्या हौदा शेजारी २-३ गायी-म्हशी-शेळ्या-कुत्री नेहमीच असत) आणि शिरल्या शिरल्या समोरच मारुतीचा पार. पारासभोवताली भरपूर मोकळी जागा. ह्या मारुतीच्या पारामागच्या वळणदार रस्त्यावरून वाळतानाच उजव्या हाताला आमच्या गायी बैलांचा गोठा लागतो, आणि पुढं १०-१२ पावलं गेलं की डाव्या हाताला आबा आणि मायचं घर.

लाखच्या घराची रुंदीच तीस एक फूट असेल. समोरच घराच्या रुंदी एवढा ओटा आणि त्या वर कौलारू छत. ओट्याच्या बरोबर मध्ये मोजून तीन पायऱ्या आणि ओट्यावर चढताच घरात शिरायला मजबूत लाकडी (अगदी जुन्या स्टाइलचं) दार. दाराच्या दोन्ही बाजूला दोन-दोन खिडक्या. आत शिरताच बैठकीची खोली. अगदी लांबलचक ओट्याच्या लांबीची. बैठकीत दोन लोखंडी पलंग, २-४ लोखंडी खुर्च्या मांडलेल्या. बाजूला लाकडी स्टूलवर टेबल फॅन. भिंतीवर दोन-तीन देवांच्या फोटोफ्रेम टांगलेल्या. भिंतीवरच्या खुंटीवरसुद्धा नेहमीच काहीतरी टांगलेलं असायचं. फक्त बैठकीच्या खोलीतच शहाबादी फरशी बसवलेली. बाकी सगळं घर शेणानं सरवलेलं असायचं. उरलेल्या घराच्या भिंतीसुद्धा विटा-मातीच्याच!

बैठकीच्या मागे लगेच मोठ्ठं अंगण. अंगणाच्या उजव्या हाताला न्हाणीघर आणि वापरायच्या पाण्याचा हौद. हौदाला लागूनच अंगण संपेपर्यंत मोठी भिंत आणि भिंती समोर चिकू, जास्वंद, कणेरीची झाडं आणि त्या समोर तुळशी वृंदावन! अंगणाच्या डाव्या हाताला अंगण संपेपर्यंत तीन खोल्या, आणि अंगण संपलं की समोरच परत एक लांबलचक खोली. ह्या सगळ्या खोल्या समोर टिनाचं शेड होतं. डाव्या बाजूच्या शेड खाली बरचसं शेतीच सामान आणि त्या समोर स्वस्तिक आणि गोडलिंबाची झाडं. आंगणासमोरच्या शेड खाली लाकडी सोपा ठेवलेला. सोप्यावर गाद्या नसल्या तरी त्यावर दुपारच्या वेळी झोपायला छान वाटायचं. डाव्या बाजूच्या पहिल्या खोलीत सगळं अडगळीचं सामान ठेवलेलं होतं तर दुसऱ्या खोलीत लाकडी कपाटं, संदुका आणि अवांतर सामान-सुमान होतं. आमचं सामान आम्ही याच खोलीत ठेवत असू. सगळं घर सारवलेलं असल्याने अंघोळ झाली की ओल्या तळपायाला माती लागून पाय खराब होतील म्हणून मला कुणालातरी (बहुदा आईच) त्या खोलीत उचलून न्यावं लागायचं. आता हे सगळं आठवलं की हसायला येतं! या खोल्यांमध्ये खिडक्या अश्या नव्हत्याच. होते ते वरच्या बाजूला असलेले झरोके. ह्या झरोक्यातून खोलीत तिरप्या दिशेने ऊन पडत असे आणि त्या उन्हात तरंगणारे धुळीचे कण पाहताना मी स्वतःतच हरवून जात असे.

आंगणातल्या समोरच्या कोपऱ्यातल्या तिसऱ्या खोलीत मायचं स्वयंपाक घर होतं, त्यात चुलं आणि गोबर गॅस वर चालणारी शेगडी होती. स्वयंपाक घराबाहेर एक जाळीची लोखंडी अलमारी होती, त्यात माय दुध, दही, लोणी, तुप ठेवायची. घरचं भरपूर दुध-दुभतं होतं त्यामुळे लाखला गेलं की मजाच मजा असायची. गायीच्या दुधावर चढणारी जाड पिवळसर साय आणि साखर म्हणजे 'जन्नत' वाटायची. चुलीवर भाजलेली भाकरी (आणि त्यावर घरचं साजुक तूप) चुलीशेजारी बसून खायची मजा काही औरच! एकंदर लाखला गेलं की माय आग्रह करून करून दुध-लोणी-तुप खायला घालायची.

घरी असलो की आमचा जास्तीत जास्त वेळ आतल्या अंगणातच जायचा . शेणानं गुळगुळीत सारवलेल्या अंगणात सकाळी सकाळी सडा टाकून झाला की माय छान रांगोळी काढायची. मायजवळ रांगोळीचे छापेपण होते. ते आमच्या हातात पडले की आम्ही आंगणभर छाप्याने रांगोळ काढत असू. माय रागवायची, म्हणायची "एकाच दिवसात रांगोळ संपवता का रे? " पण आम्ही ऐकत नसू. घरी असलो की आम्ही खेळून खेळून अंगण खराब करायचो. माय रागवायची अंगण खराब केलं म्हणून, पण चुपचाप बसलं की म्हणायची "जारे खेळा आंगणात", मग सगळे परत आंगणात. घरापेक्षा आंगणातच जास्तं वेळ जायचा. उन्हाळ्याच्या दिवसात रात्री याच अंगणात एका रांगेत बाज (खाट) घालून सगळे जण झोपायचो. गार हवेची झुळुक आणि आकाशातले तारे मोजत कधी झोप लागायची ते कळायचंच नाही. जाग यायची तिच पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटाने. थंडीच्या दिवसात आम्ही लाखला गेलो तर बैठकीच्या खोलीत झोपत असु. सकाळी उठलो की खिडकीत बसून बाहेरच्या रस्त्यावरून अभंग गात काकड आरती साठी मारुतीच्या पारावर जाणारे लोक बघायला मजा यायची. त्यांचे ते कानावर पडलेले सुर मन प्रसन्न करायचे.

विदर्भातली शेती मुख्यत्वे कोरडवाहूच. शेतातल्या विहिरीला भरपूर पाणी असले तर ऊसाची लागवड करता येते, पण प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच शेती करायला लागते. आबांची शेतीसुद्धा (१-२ शेतं सोडलेतर) कोरडवाहूच. त्यामुळे कापूस, तुर, हरभरा, ज्वारी, गहू हेच धान्य शेतात पिकत असे. आबांचा संत्र्याचा मळादेखील होता. भरपूर आंबेपण पिकायचे शेतात. सगळे गावरान आंबे. त्यांची नावेपण तशीच - खोबऱ्या, भद्या, साखरघोटी (त्यांच्या प्रकारावरून पडलेली) अश्या प्रकारची. आम्ही हेच आंबे खाऊन मोठे झालो, त्यामुळे हापूस आंब्यांच कौतुक आम्हाला कधीच नव्हतं (भुवया उंचावू नका)! शेतातून फिरायला पण मजा यायची. चालून चालून थकलो की बाबुलाल दादा खांद्यावर घ्यायचा. परत येताना गावाच्या बाजूलाच असलेल्या ओढ्यातून खूप सारे रंगीत दगड गोळा करून आणायचो. दोन-चार दिवस कसे जायचे ते कळायचं देखील नाही!

आबा गेल्यानंतर माय काही वर्ष एकटी तिथे राहिल्याने (आणि आम्ही त्यावेळी लहान असल्याने) लाखच्या घराचा एवढा सहवास नशिबी तरी आला. पुढे मायची तब्येत ठीक राहत नसल्याने किंवा एकटी कशाला राहा अशा विचाराने ति आमच्या बरोबर राहायला आली. घरात घरातली कर्ती बाईच नाही म्हटल्यावर घराची आबाळ होणारच; लाखच्या घराचंही तसंच झालं. आम्ही (भावंडं) मोठे होत होतो, शिकायला घराबाहेर पडत होतो त्यामुळे लाखला जायला नाही मिळायचं. मागे एकदा जाणं झालं तेव्हा मायला पण घेऊन गेलो होतो. घराचा रंग उडलेला होता. घरातल्या खोल्यांतली जमीन उंदरांनी उकरलेली. सगळी झाडं वाळलेली. सगळं कसं मोडकळीस आल्या सारखं वाटलं (कोणी तिथे राहतच नसल्याने बैठकीची खोली सोडली तर बाकी घराची साफसफाई झालीच नव्हती). घराकडे बघून माय गाडीतून उतरली पण नाही. एवढंच म्हणाली "काय बघायचं रे, माझ्या सारखंच झालंय घरं, जुनं अन मरायला टेकलेलं! " ति जे बोलली ते जरी खरं असलं तरी, आपल्या आयुष्यातली प्रिय व्यक्ती जशी आपल्या मनातून कधीच जात नाहीत, तसंच लाखंच घर माझ्या मनातून कधीच जाणार नाही!

1 comment:

Unknown said...

It's really nice to read about Lakh written by you..I like it very much and your way of writing of Marathi.Really,You didn't forget anything about Lakh.

While reading this, actual picture has been made in front of my eyes..You are Nice Writer...Keep it Up!!!