Tuesday, January 13, 2009

समजूत

प्राजु ताईने आपल्या "माझं काय चुकलं... " या कवितेतून एका छोटीचे आपल्या आजीपाशी मांडलेले मनोगत व्यक्त केले आहे. कविता सुंदरच आहे! (कविता वाचण्यासाठी इथे टिचकी मारा). लहान असताना कदाचित प्रत्येकानेच आपल्या आईचा धपाटा खाल्ला असेल. त्या वयात तो धपाटा आपण का खाल्ला हे आपल्याला कळतही नसते, आणि म्हणूनच की काय ति छोटी आपल्या आजीला विचारते "माझं काय चुकलं..?" छोटीच्या ह्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून मला उत्स्फुर्तपणे सुचलेली आजीची प्रतिक्रिया किंवा आजीने छोटीची काढलेली समजूत खालच्या कवितेत (बडबड गीतात?) देत आहे.

*************************************
राणी मा़झी छोटुली तू, आहेस उचापती
हसू येते मला, पाहून तुझ्या करामती

ललू नको बघ तुझे नाक झाले लाल
हस बघू, फुगवू नको गोबले गोबले गाल

हसलीस की तुला देईन गोड गोड खाऊ
संध्याकाळी फिरायला आपण दोघीच जाऊ

फुगे घेऊ, बाग पाहू, करू मस्तं धमाल
बाबांसाठी घेऊन येऊ एक पांधला रुमाल

माललं त मालू दे, आई आहेच वेडी
हसण्या रुसण्यातही अगं गंमत असते थोडी

*************************************

-अनामिक

Monday, January 12, 2009

विजेची बचत

गेल्या विकांताला इंटरनेटवर गायनाच्या रियालिटी शोचा फिनाले बघत होतो. शो छान वाटला, बघायला मजा आली. पण बघता बघता एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ति म्हणजे त्या किंवा तत्सम कार्यक्रमात स्टेजवर केलेला 'झगमगाट'. प्रत्येक शो साठी वेगवेगळा स्टेज तयार करण्यात येतो आणि त्यावर गरज नसतानाही हजारो दिवे लावून स्टेज सजवले जाते. एकीकडे जिथे लोड शेडिंगमुळे सामान्य माणसाच्या घरात ८ ते १० तास वीज नसते (खेडे विभागात १२-१६ तास) तिथे अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी गरजेपेक्षा जास्त वीज वापरणे किती योग्य? यावर आपल्या सरकारचे काही नियम/ काही बंधनं असायला नकोत का? बरं टी. व्ही चॅनल्सची संख्या दिवसागणिक वाढतच जातेय. आणि प्रत्येक चॅनलवर शेकडो शो... तेवढेच स्टेज... आणि तेवढाच झगमगाट/ विजेचा अपव्यय! याला कुठेतरी मर्यादा असायला हवी असे वाटते.

मागे एकदा अमिताभचा वर्ल्ड टूर (इंटरनेटवर) बघत असताना, साहेब/त्यांची पत्नी जयाबाई ग्लोबल वॉर्मिंगवर भाष्य करत होते (असंच काहीसं अक्षय कुमारपण करतो म्हणे अवॉर्ड शोज मध्ये). लोक म्हणत असतील बापरे, हा माणूस सांगतोय तर खरंच विजेची बचत करायलाच पाहिजे. कुठेतरी त्यांना विजेच्या बचतीची जाणीव होतही असेल. लोक त्यांच्या भाष्याने प्रेरित झाले तर आनंदच आहे, पण मलातरी अमिताभचं ते भाष्य म्हणजे 'लोका सांगे.... " वाटलं. दुसऱ्याला उपदेश देणाऱ्या अमिताभला विचारावंस वाटलं की "बाबारे दुसऱ्याला तू अगदी कळवळीने पटवून देतोयेस वीज बचती बद्दल, ते ठीकच. पण तुझ्या शो साठी या स्टेजवर जे हजारे-लाखो दिवे लावल्येत त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे?" दुसऱ्याला सांगणे किती सोपे असते नाही?

असाच दुसरा एक प्रकार म्हणजे भारतात वाढत चाललेली मॉल संस्कृती. मॉलमध्येच नव्हे तर कोणत्याही शो-रुम मध्ये गेलात तर शेकडो दिवे आपलं स्वागत करतात. आता माल विकण्यासाठी खरंच ह्या शेकडो दिव्यांची गरज असते का असं विचारलं तर "नाही" असच उत्तर येईल. भर दिवसा सुद्धा दुकानात एवढे दिवे लावून विजेचा अपव्यय करण्याला काय म्हणावे? अशा सार्वजनिक ठिकाणी विजेचा अपव्यय टाळला तर घरोघरी होणारं लोड शेडिंग थोडं तरी कमी होईल असे वाटते.

सार्वजनिक ठिकाणं सोडली तर वैयक्तिक पातळीवर विजेची बचत करायचा किती जण प्रयत्न करतात? खरे पाहता आपल्यात अजून पुरेशी जाणीवच (अवेअरनेस) नाही आहे विजेची बचत करण्यासाठी. लोड शेडिंग कमी करण्यासाठी सरकार काहीच करत नाही असे म्हणून, सरकारला दोष देऊन आपण मोकळे होतो. पण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करण्यास असमर्थ ठरतो. जर प्रत्येकाने निश्चय केला तर साध्या साध्या गोष्टीतून विजेचा अपव्यय टाळता येतो. जसे...

१. आपण ज्या खोली मध्ये आहोत ति सोडून बाकीच्या खोलीतले दिवे/पंखे बंद असण्याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास फ्लुरोसंट दिवे वापरावे.
२. ऑफिसमधून घरी जाताना किंवा घरातून ऑफिसात जाताना संगणक बंद करावा.
३. दोन तीन दिवसांपेक्षा जास्त घराबाहेर राहणार असाल तर मायक्रोवेव्ह, टिवी, संगणक, (फ्रीज चालू ठेवावा) आणि इतर मशीन्स बंद करून 'अनप्लग' कराव्यात. ह्या मशीन्स स्टँड बाय वर असल्याने देखील वीज खर्च करतात.
४. ए. सी. वापरताना सर्व दरवाजे, खिडक्या बंद आहेत की नाही हे व्यवस्थित तपासून घ्यावे. शक्यतो पंख्याचाच जास्त उपयोग करावा.
५. घरात वॉशिंग मशीन असेल तर तिचा उपयोग योग्य प्रमाणात कपडे गोळा झाल्यावरच करावा.
६. मुख्य म्हणजे दिवसा सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग करावा. खिडक्या उघड्या ठेवल्या तर घरात प्रकाश येतोच, आणि हवा खेळती राहते (ज्यांचे घर जादा वाहतुकीच्या ठिकाणी आहे त्यांनी स्वतःला हवे तसे उपाय अमलात आणावेत). उगाच गरज नसताना दिवे/पंखे वापरू नये.


अशा छोट्या छोटया गोष्टीतूनसुद्धा बऱ्याच प्रमाणात वीज वाचवता येते. मी जे काय म्हणतोय त्याच्याशी तुम्ही सहमत असालच आणि आपापल्या परीने विजेची बचत करतही असाल. शेवटी आपल्यापासून सुरवात केली तर लोक सुद्धा हळू हळू प्रेरित होतील. मी माझ्यापुरतं केलंय म्हणून चालणार नाही आहे, कारण वर म्हटल्याप्रमाणे हा प्रश्न फक्त वैयक्तिक पातळीवरचा नाहीये. सार्वजनिक ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होतोय, आणि आपण ह्या विजेच्या अपव्ययावर आळा घालण्यासाठी काहीच करत नाही आहोत याची खंत वाटते.

अनामिक

(कदाचित हा चावून चोथा झालेला विषय असेलही, पण प्रत्येकाला विजेच्या बचतीची जाणीव व्हावी म्हणून अजून एक प्रयत्न समजा)

Wednesday, January 7, 2009

लाखचं घर

लाखचं घर म्हणजे लाख रुपयांच घर नाही... लाख हे माझ्या आजोबांच्या (आबांच्या) गावाचं नाव. 'लाख' - यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातलं, दिग्रसपासून जवळ-जवळ १५-२० किमी अंतरावर असलेलं एक खेडेगाव. आबा मी लहान असतानाच वारल्याने या घराशी माझा जास्त संबंध आलाच नाही, त्यामुळे खूप आठवणी आहेत असं म्हणू शकत नाही. पण तरीही या घराचं माझ्याशी असलेलं नातं वेगळंच आहे... कुठंतरी खोल खोल रुजलेलं! माझे काका दिग्रसला राहतात त्यामुळे आम्ही सगळे (भावंडं) सुट्या लागल्या की काकाच्या घरीच जास्त राहायचो. आणि मग एखाद्या दिवशी काका आपल्या गाडीतून लाखच्या घरी घेऊन जायचे; किंवा मग बाबा/काका आम्ही सगळे लाखला येणार आहोत असा निरोप पाठवायचे. तसंही त्या दिवसात, आणि तेही आपल्याच आजीच्या (मायच्या) घरी जायला निरोप पाठवायची गरज नसायची. पण सुरवातीच्या काळात महामंडळाची बस अगदी गावापर्यंत जात नसे. मग आम्ही बसने जाणार असलो की आधीच निरोप पाठवायला लागायचा, जेणेकरून कोणीतरी गडीमाणूस (सहसा बाबुलाल दादा किंवा श्रावण दादा) बैलगाडी घेऊन फाट्यावर यायचा.

फाट्यापासून लाख जवळ जवळ २-३ किमी अंतरावर असेल. आम्ही फाट्यावर उतरताच बाबुलाल दादा "काय मंग बालू (बाला/बालू/बाल्या हे माझं टोपण नाव) कवा आले दिग्रसले?" अशी विचारपूस करतच आपलं सामान स्वतःच्या हातात घेऊन बैलगाडीत ठेवत असे. आम्ही सगळे बैलगाडीत बसलो की मग रमत गमत, दोन्ही बाजूला पसरलेल्या शेतातून नजर फिरवत घराकडे जात असू. कधी कधी बाबुलाल दादा त्याच्या बरोबर बैलगाडी चालवायला द्यायचा (म्हणजे हातात फक्त दोर पकडायला द्यायचा). त्या खडकाळ रस्त्यावर बैलगाडी चालताना खूप धूळ उडायची, पण त्यावेळी त्यातही गंमत वाटायची. गावात शिरतानाच उजव्या बाजूला पाण्याच्या मोठ्ठा हौद होता (त्या हौदा शेजारी २-३ गायी-म्हशी-शेळ्या-कुत्री नेहमीच असत) आणि शिरल्या शिरल्या समोरच मारुतीचा पार. पारासभोवताली भरपूर मोकळी जागा. ह्या मारुतीच्या पारामागच्या वळणदार रस्त्यावरून वाळतानाच उजव्या हाताला आमच्या गायी बैलांचा गोठा लागतो, आणि पुढं १०-१२ पावलं गेलं की डाव्या हाताला आबा आणि मायचं घर.

लाखच्या घराची रुंदीच तीस एक फूट असेल. समोरच घराच्या रुंदी एवढा ओटा आणि त्या वर कौलारू छत. ओट्याच्या बरोबर मध्ये मोजून तीन पायऱ्या आणि ओट्यावर चढताच घरात शिरायला मजबूत लाकडी (अगदी जुन्या स्टाइलचं) दार. दाराच्या दोन्ही बाजूला दोन-दोन खिडक्या. आत शिरताच बैठकीची खोली. अगदी लांबलचक ओट्याच्या लांबीची. बैठकीत दोन लोखंडी पलंग, २-४ लोखंडी खुर्च्या मांडलेल्या. बाजूला लाकडी स्टूलवर टेबल फॅन. भिंतीवर दोन-तीन देवांच्या फोटोफ्रेम टांगलेल्या. भिंतीवरच्या खुंटीवरसुद्धा नेहमीच काहीतरी टांगलेलं असायचं. फक्त बैठकीच्या खोलीतच शहाबादी फरशी बसवलेली. बाकी सगळं घर शेणानं सरवलेलं असायचं. उरलेल्या घराच्या भिंतीसुद्धा विटा-मातीच्याच!

बैठकीच्या मागे लगेच मोठ्ठं अंगण. अंगणाच्या उजव्या हाताला न्हाणीघर आणि वापरायच्या पाण्याचा हौद. हौदाला लागूनच अंगण संपेपर्यंत मोठी भिंत आणि भिंती समोर चिकू, जास्वंद, कणेरीची झाडं आणि त्या समोर तुळशी वृंदावन! अंगणाच्या डाव्या हाताला अंगण संपेपर्यंत तीन खोल्या, आणि अंगण संपलं की समोरच परत एक लांबलचक खोली. ह्या सगळ्या खोल्या समोर टिनाचं शेड होतं. डाव्या बाजूच्या शेड खाली बरचसं शेतीच सामान आणि त्या समोर स्वस्तिक आणि गोडलिंबाची झाडं. आंगणासमोरच्या शेड खाली लाकडी सोपा ठेवलेला. सोप्यावर गाद्या नसल्या तरी त्यावर दुपारच्या वेळी झोपायला छान वाटायचं. डाव्या बाजूच्या पहिल्या खोलीत सगळं अडगळीचं सामान ठेवलेलं होतं तर दुसऱ्या खोलीत लाकडी कपाटं, संदुका आणि अवांतर सामान-सुमान होतं. आमचं सामान आम्ही याच खोलीत ठेवत असू. सगळं घर सारवलेलं असल्याने अंघोळ झाली की ओल्या तळपायाला माती लागून पाय खराब होतील म्हणून मला कुणालातरी (बहुदा आईच) त्या खोलीत उचलून न्यावं लागायचं. आता हे सगळं आठवलं की हसायला येतं! या खोल्यांमध्ये खिडक्या अश्या नव्हत्याच. होते ते वरच्या बाजूला असलेले झरोके. ह्या झरोक्यातून खोलीत तिरप्या दिशेने ऊन पडत असे आणि त्या उन्हात तरंगणारे धुळीचे कण पाहताना मी स्वतःतच हरवून जात असे.

आंगणातल्या समोरच्या कोपऱ्यातल्या तिसऱ्या खोलीत मायचं स्वयंपाक घर होतं, त्यात चुलं आणि गोबर गॅस वर चालणारी शेगडी होती. स्वयंपाक घराबाहेर एक जाळीची लोखंडी अलमारी होती, त्यात माय दुध, दही, लोणी, तुप ठेवायची. घरचं भरपूर दुध-दुभतं होतं त्यामुळे लाखला गेलं की मजाच मजा असायची. गायीच्या दुधावर चढणारी जाड पिवळसर साय आणि साखर म्हणजे 'जन्नत' वाटायची. चुलीवर भाजलेली भाकरी (आणि त्यावर घरचं साजुक तूप) चुलीशेजारी बसून खायची मजा काही औरच! एकंदर लाखला गेलं की माय आग्रह करून करून दुध-लोणी-तुप खायला घालायची.

घरी असलो की आमचा जास्तीत जास्त वेळ आतल्या अंगणातच जायचा . शेणानं गुळगुळीत सारवलेल्या अंगणात सकाळी सकाळी सडा टाकून झाला की माय छान रांगोळी काढायची. मायजवळ रांगोळीचे छापेपण होते. ते आमच्या हातात पडले की आम्ही आंगणभर छाप्याने रांगोळ काढत असू. माय रागवायची, म्हणायची "एकाच दिवसात रांगोळ संपवता का रे? " पण आम्ही ऐकत नसू. घरी असलो की आम्ही खेळून खेळून अंगण खराब करायचो. माय रागवायची अंगण खराब केलं म्हणून, पण चुपचाप बसलं की म्हणायची "जारे खेळा आंगणात", मग सगळे परत आंगणात. घरापेक्षा आंगणातच जास्तं वेळ जायचा. उन्हाळ्याच्या दिवसात रात्री याच अंगणात एका रांगेत बाज (खाट) घालून सगळे जण झोपायचो. गार हवेची झुळुक आणि आकाशातले तारे मोजत कधी झोप लागायची ते कळायचंच नाही. जाग यायची तिच पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटाने. थंडीच्या दिवसात आम्ही लाखला गेलो तर बैठकीच्या खोलीत झोपत असु. सकाळी उठलो की खिडकीत बसून बाहेरच्या रस्त्यावरून अभंग गात काकड आरती साठी मारुतीच्या पारावर जाणारे लोक बघायला मजा यायची. त्यांचे ते कानावर पडलेले सुर मन प्रसन्न करायचे.

विदर्भातली शेती मुख्यत्वे कोरडवाहूच. शेतातल्या विहिरीला भरपूर पाणी असले तर ऊसाची लागवड करता येते, पण प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच शेती करायला लागते. आबांची शेतीसुद्धा (१-२ शेतं सोडलेतर) कोरडवाहूच. त्यामुळे कापूस, तुर, हरभरा, ज्वारी, गहू हेच धान्य शेतात पिकत असे. आबांचा संत्र्याचा मळादेखील होता. भरपूर आंबेपण पिकायचे शेतात. सगळे गावरान आंबे. त्यांची नावेपण तशीच - खोबऱ्या, भद्या, साखरघोटी (त्यांच्या प्रकारावरून पडलेली) अश्या प्रकारची. आम्ही हेच आंबे खाऊन मोठे झालो, त्यामुळे हापूस आंब्यांच कौतुक आम्हाला कधीच नव्हतं (भुवया उंचावू नका)! शेतातून फिरायला पण मजा यायची. चालून चालून थकलो की बाबुलाल दादा खांद्यावर घ्यायचा. परत येताना गावाच्या बाजूलाच असलेल्या ओढ्यातून खूप सारे रंगीत दगड गोळा करून आणायचो. दोन-चार दिवस कसे जायचे ते कळायचं देखील नाही!

आबा गेल्यानंतर माय काही वर्ष एकटी तिथे राहिल्याने (आणि आम्ही त्यावेळी लहान असल्याने) लाखच्या घराचा एवढा सहवास नशिबी तरी आला. पुढे मायची तब्येत ठीक राहत नसल्याने किंवा एकटी कशाला राहा अशा विचाराने ति आमच्या बरोबर राहायला आली. घरात घरातली कर्ती बाईच नाही म्हटल्यावर घराची आबाळ होणारच; लाखच्या घराचंही तसंच झालं. आम्ही (भावंडं) मोठे होत होतो, शिकायला घराबाहेर पडत होतो त्यामुळे लाखला जायला नाही मिळायचं. मागे एकदा जाणं झालं तेव्हा मायला पण घेऊन गेलो होतो. घराचा रंग उडलेला होता. घरातल्या खोल्यांतली जमीन उंदरांनी उकरलेली. सगळी झाडं वाळलेली. सगळं कसं मोडकळीस आल्या सारखं वाटलं (कोणी तिथे राहतच नसल्याने बैठकीची खोली सोडली तर बाकी घराची साफसफाई झालीच नव्हती). घराकडे बघून माय गाडीतून उतरली पण नाही. एवढंच म्हणाली "काय बघायचं रे, माझ्या सारखंच झालंय घरं, जुनं अन मरायला टेकलेलं! " ति जे बोलली ते जरी खरं असलं तरी, आपल्या आयुष्यातली प्रिय व्यक्ती जशी आपल्या मनातून कधीच जात नाहीत, तसंच लाखंच घर माझ्या मनातून कधीच जाणार नाही!