Thursday, August 20, 2009

आठवणीतला पोळा

फोटो जालावरून साभार


आज श्रावणी अमावस्या, म्हणजे पोळा. घरच्या बैलांची पुजा करून त्यांच्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस. महाराष्ट्रातल्या संपुर्ण ग्रामीण भागात आजही आनंदाने साजरा होणारा सण. हा सण येतोही अगदी श्रावण महिण्याच्या शेवटी, जेव्हा शेतातली पेरणीची कामे संपलेली असतात. शेतकर्‍याच्या डोक्यावरचा भार बैलांच्या मदतीने पुर्ण हलका झालेला असतो. बैलांचे हे उपकार ह्या एका दिवसाच्या पुजेने थोडेच फिटणार आहेत? तरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रकार मला अगदी भावतो. प्रत्येक शेतकरी सच्च्या दिलाने हा सण साजरा करतो. लहानपणापासूनच मला या सणाचं विशेष आकर्षण वाटत आलं आहे. माझ्या पोळ्याबद्दलच्या आठवणीही तशाच आहेत.

आमच्या घरी आजोबांची बर्‍यापैकी शेती होती(/आहे). पण पोळ्याचा सण हा आम्ही सध्या जिथे राहतो त्याच गावी, म्हणजे उमरखेडमधेच (विदर्भात आहे) साजरा करत असू. खरंतर उमरखेड हे माझं आजोळ म्हणायला हवं. माझे बाबा इथे व्यवसायाकरता आले. मामाची उमरखेड मधेच शेती आहे, शेतात दोन बैलजोड्याही आहेत. त्यामुळे शिकण्यासाठी गावाबाहेर पडेपर्यंत पोळा अगदी उत्साहात साजरा केलाय. सगळ्या शेतकर्‍यांची जशी होते तशीच मामाकडेही पोळ्याची तयारी दोन-चार दिवस आधीपासूनच सुरु व्हायची. मागल्या वर्षी कुठेतरी घड्या करून ठेवलेले झूल संदुका, कपाटातून बाहेर यायचे आणि नीट झटकून बाहेर अंगणात उन खायला ठेवलेले असायचे. सोबतच बाशींगे, गोंडे, तुरे, इ. सामानही कपाटतून बाहेर यायचं. सगळं सामान व्यवस्थीत वापरण्याजोगं आहे की नाही याची खातरजमा व्हायची. बैलांची शिंगे रंगवायला ऑईलपेंटचा डबा, ब्रश, आणि बेगडही खरेदी करून झालेलं असायचं. मी ही सगळी तयारी स्वतः कधीच केली नाही, पण पोळ्याच्या एक दिवस आधी मामाकडे गेलं की सगळं तयार दिसायचं.

आमच्या भागात पोळ्याचा अधीच्या दिवसाला खांदमळनाचा दिवस म्हणतात. ह्या दिवशी सायंकाळी शेतातला गडी घरी बैल घेऊन यायचा. त्यांची पुजा करण्याआधी बैलांच्या खांद्यावर भिजवलेली हळद लावली जायची. मला हा प्रकार म्हणजे नवर्‍या मुला/मुलीला लग्नाच्यावेळी हळद लावण्याचा जो प्रकार आहे तसाच वाटायचा. हळद लावून झाली की बैलांची पाय धुवून पुजा आणि आरती केली जायची. त्यांच्या कानात दुसर्‍या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी घरी येऊन सण साजरा करण्याचं आमंत्रण दिलं जायचं. सगळ्यांची जेवणं झाली की गडी बैलांना घेऊन परत शेतात जायचा.

पोळ्याच्या दिवशी गावात सगळीकडेच फार गडबड असायची. घरी दारांवर आंब्याच्या पानांची तोरणं लावली जायची. घराच्या प्रवेशदाराच्या दोन्ही बाजूला पळसाच्या फांद्या, ज्याला 'मेढी' म्हणतात, उभ्या केल्या जायच्या (ह्या मेढीचं काय महत्व ते माहीत नाही). खर्‍याखुर्‍या बैलांसोबतच घरी मातीच्या बैलांचीही पुजा होत असे. त्यासाठी एक लाकडी पाट चुना आणि गेरूने रंगवला जायचा. त्यावर बैलांची मांडनी करून मग मी आणि दादा पुजा करत असू. हा प्रकार संपवून मी मामाकडे पोचेपर्यंत बैलांची अंघोळ घालून झालेली असायची. त्यानंतर मी आणि मामेभाऊ मिळून त्यांच्या शिंगांना रंग देत असू. रंग देताना ब्रश बैलांच्या अंगाला कुठे लागू नये याची काळजी घ्यावी लागे. शिंगांवरचा रंग वाळत आला की त्यावर बेगड लावायची. दुपारी ४ च्या सुमारास बैलांना अजून सजवायला सुरवात व्हायची. बाशिंगे, तुरे बैलांच्या कपाळावर चढवली जायची. पाठीवर झूल आणि पायात घुंगरू बांधले जायचे. मस्तं सजवलेले बैल खूपच दिमाखदार दिसायचे.

तयार झालेले बैल घेवून मारुतीचे मंदीर असलेल्या चौकात, म्हणजे पोळा भरायच्या ठिकाणी घेऊन जायचो. मंदिराभोवती एक प्रदक्षणा घालून बैलांना घेउन एका निश्चित ठिकाणी उभे रहायचे. शेकडो-हजारो लोक आपापल्या बैलजोड्या घेऊन या चौकात जमा व्हायचे. आम्ही भावंडं कोणते बैल किती सजले आणि कोणते खूप छान दिसताहेत हे बघत फिरायचो. तासेक भर फिरून होईस्तोवर गावच्या मानलेल्या पाटलाचे बैल पोळ्याच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात, वाजत गाजत यायचे. ह्यांच्या मंदिराभोवती प्रदक्षणा मारून झाल्या की सगळी कडे 'पोळा फुटला' ही बातमी क्षणात पसरायची. सगळीकडे एकच गोंधळ.... आपापल्या बैलांना घरी घेऊन जाण्यासाठी. घरी परतताना आम्ही भरपुर फुगे आणि लाडीलप्पे (पाण्याचे फुगे) खरेदी करून नेत असू. घरी आलो की बैलाची परत एकवेळ पुजा आरती केली जायची. पुरणपोळीच्या जेवणाने पोळ्याचा दिवस संपायचा.

पोळ्याचा दिवस संपला तरी लोकांचा उत्साह कमी होत नसे. दुसर्‍या दिवशी बैलांची वाजत गाजत मिरवणूक निघत असे. ह्या दिवसाला तन्हा पोळाही म्हणत. कारण ह्या दिवशी लहान मुले घरी पुजा केलेल्या मातीच्या बैलांना घरोघरी मिरवून आणत असत. कुणी ह्या मुलांना खाऊसाठी पैसे देत तर कुणी खरोखरचा खाऊ. कितीतरी खेडेगावात तर या दिवशी बैलगाड्यांच्या शर्यती लागतात म्हणे. असा पोळा साजरा करून आज बरीच वर्षे उलटलीत पण सगळं तस्संच्या तसं डोळ्यासमोर आहे. शहरी भागातल्या कितीतरी लोकांना पोळा भरणे, पोळा फुटणे हे प्रकार माहीतही नसतील. म्हणूनच माझ्या आठवणीतून आमच्या गावच्या पोळ्याची ओळख करून द्यायचा का खटाटोप.

पोळ्याच्या दिवशी सजवण्यात येणार्‍या बैलांवर लहान असताना आईने एक कविता शिकवली होती. मध्यंतरी ती विसरलो होतो, पण मग प्राजु ताईने ति कविता तिच्या यजमानांकडून मिळवून दिली होती... ति कवीता इथे देत आहे. ह्या कवितेसाठी
प्राजु ताई आणि तिच्या यजमानांचे खूप खूप धन्यवाद!

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार

राजा परधान्या, रतन दिवाण
वजीर पठाण, तुस्त मस्त

वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलाला गे

दुल दुलतात, कुणाची वशींडे
काही बांड खोंडे, अवखळ

कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
पिवळे तांबडे, शोभिवंत

वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा
सण बैल पोळा, ऐसा चाले

जरी मिरवीती, परि धन्या हाती
वेसणी असती, घट्ट पट्टा

झुलीच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले

आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर

सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मर मर, ओढायाचे.

काहीवेळा झुलीच्या खाली असलेले वळ जरी खरे असले तरी बहुतांशी शेतकर्‍याचे त्याच्या बैलांवर खरोखर प्रेम असते. ते त्यांची खूप काळजी घेताना दिसतात. त्यामुळे ह्या कवितेचा शेवट मला तितका आवडत नाही.

-अनामिक

Sunday, August 16, 2009

क क क क कमीने

फ्पॉयलर अलर्टः या परिक्फणात कथा न फांगण्याचा खूप प्रयत्न केलाय. तरी वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर वाचावे.

आताच 'कमीने' बघून आलो. आता मी हा चित्रपट का पाहिला अफे विचारणार अफाल तर उत्तर आहे केवळ करमणूकीकरता आणि फनीवारचा वेळ चांगला जावा म्हणून. कालपरवाच्या पेपरात ह्या चित्रपटाला चार चांदण्या मिळालेल्या पाहिल्या आणि जायचं पक्कं केलं. तफा फमिक्फकांनी दिलेल्या चांदण्यांचा आजकाल माझ्यावर काही परिणाम होत नाही. केवळ एक चांदणी मिळालेला 'कंबख्त इफ्क' आणि तीन का चार चांदण्या मिळालेला 'लव्ह आज कल' हे दोन्ही चित्रपट भंगार (पहिला अतिफय आणि दुसरा जरा कमी) कॅटेगरीमधेच मोडतात... त्यामुळे कमीनेपासून 'करमनूक व्हावी' एवढीच माफक अपेक्फा होती. तफेच विफाल भारद्वाजचा चित्रपट अफल्याने चांगला अफणार अफेही वाटले होते. चित्रपट पाहण्याचं अजून एक कारण म्हणजे प्रियांका चोप्रा... ह्या पोरीवर आमचा फार जीव!, तिच्या चेहर्‍यावरचं एक हफू आणि तिने केलेला ओठांचा चंबू आम्हाला कुठं कुठं जाऊन भिडतो आणि मग अमंळ गुदगुल्या होतात. अफो, चित्रपट फंपल्यावर मात्र त्यावर खर्च झालेले पैफे वफूल झाल्याच फमाधान मी धरून बर्‍याच जणांच्या चेहर्‍यावर दिफलं.

चित्रपट चांगला आहे यात वादच नाही. चित्रपटाची कथा फांगत बफत नाही... थोडीफार कल्पना मात्र जरूर देतो. कथा एकमेकांपाफून दुर राहणार्‍या आणि पुर्वायुफ्यात झालेल्या एका प्रफंगावरून आपफात वितुफ्ट आलेल्या दोन जुळ्या भावांची आहे. गुड्डू आणि चार्ली (दोघेही फाहीद कपूर). त्यातला गुड्डू फरळमार्गी, कॉलेजात फिकणारा आणि फ्वीटीच्या (म्हणजे प्रियांका चोप्राच्या) प्रेमात पडून बराच पुढे गेलेला. तर चार्ली जरा गुंड प्रवृत्तीचा, घोड्यांच्या रेफचा बुकी व्हायचं फ्वप्न बघणारा, आणि फॉर्टकट वापरून पैफे कमवण्याचा मागे अफलेला. चित्रपटातील हे मुख्य दोन ओळखीचे चेहरे फोडले तर बाकी फगळे नवीन चेहरे आहेत. त्यातल्या त्यात अमोल गुप्ते, ज्यानी फ्वीटीच्या महाराफ्ट्राभिमानी गुंड भावाची ज्याला नेता व्हायचंय अफी भूमीका फाकारली आहे, हे नाव ऐकून होतो. अमोल गुप्ते हा एकच गुंड या चित्रपटात नाहीये. अजून दोघे भ्रफ्ट पोलीफ, आणि ड्रग्फ फ्मगल करणारी एक गँगही या चित्रपटात आहे. चार्लीला अचानक मिळालेल्या एका फॉर्टकट्मुळे आणि गुड्डूच्या नाईलाजाने एकमेकांपाफून दुर राहणारे दोघे भाऊ फंकटात फापडतात. त्यात जुळे अफल्याने वेगवेगळ्या गुंडाच्या ताब्यात (म्हणजे जो ज्या गुंडाच्या ताब्यात हवा नेमके त्याऊलट) येतात... पुढेही बरेच काही घडते ते चित्रपटातच पहा. फुरवातीला अगदी थोडावेळ फंथगती अफलेला हा चित्रपट पुढे खूप वेग घेतो तो फंपेपर्यंत थांबतच नाही. प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी होतो.

चित्रपटातल्या फगळ्याच कलाकारांच काम छान झालं आहे. फाहीद कपूरने दोन जुळे भाऊ किंबहुना दोन भिन्न व्यक्ती उत्तमरित्या फाकारल्या आहेत. प्रियांका चोप्राने मराठी मुलीची डिग्लॅमरफ भुमीका फाकरली आहे जी तिच्या पुर्वीच्या चित्रपटांपे़क्फा बरीच वेगळी आहे. तिच्या तोंडी अफलेले मराठी फंवाद ऐकायला चांगले वाटतात. अमोल गुप्तेनेही त्याच्या भुमीकेचं फोनं केलं आहे. चार्लीच्या मित्राची भुमीका फाकारणारा नवकलाकारही लक्फात राहतो. बाकीचे कलाकार नवीनच दिफले, म्हणूनच की काय त्या त्या भुमीकेत योग्य वाटतात. गुंडगीरीची पारफ्वभूमी अफली तरी अधेमधे येणारे हलकेफुलके फंवाद प्रेक्फकांचं चांगलं मनोरंजन करतात.

विफाल भारद्वाजच्या बर्‍यापैकी गाजलेल्या ओंकारानंतर कमीने हा चित्रपट तो एक परिपक्व दिग्दर्फक अफण्यावर फिक्कामोर्तब करतो. खरंतर जुळे भाऊ, गुंडगीरीची पार्फ्वभूमी, बॉलीवूड फ्टाईल कथा अफूनही कमीने आपलं वेगेळेपण राखून ठेवतो. दिग्दर्फकाचं खरं यफ कथेच्या हाताळणीत आहे कारण कथेचा विफय बघता चित्रपटात तोच-तोपणा येऊ फकला अफता किंवा कंटाळवाणा होऊ फकला अफता. पण उत्तम चित्रीकरण, फंकलन आणि कथेला दिलेल्या वेगामुळे अफे घडत नाही. आता अफं होईल अफं वाटत अफताना तफं घडतही नाही. काही जणांना फेवटी चित्रपट थोडा अतिरंजीत वाटू फकतो, पण तेव्हाही दिग्दर्फकाने एक-दोन हलके फुलके प्रसंग घालून तो अतिरंजीतपणा कमी करण्याचा प्रयत्न केलाय. चित्रपटात दाखवलेली मुंबई खुपच खरी वाटते. कुठेही विनाकारण फ्वच्छ फेट नाहीत. आपल्या आजूबाजूला जफे वातावरण अफेल तफेच आहे (नाहीतर करण जोहरच्या चित्रपटातला भिकारीफुद्धा डिझायनर कपडे घालून फंगमरवरी वाडग्यात भिक मागत अफतो). चित्रपटातलं 'ढँ ट ढॅण' हे गाणं फोडलं तर दुफरी कोणतीच गाणी माहीत नव्हती, तरीही चित्रपट बघताना काही फरक पडला नाही. गाणी मोजकीच आणि योग्य ठिकाणी अफल्याने चित्रपटात अडथळा वाटत नाहीत. एकंदरीत चित्रपट प्रभावी आणि बघण्यासारखा झालांय. फ्वाईन फ्लूचा धफका कमी झाला की हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन जरूर बघा.

मी चित्रपटाला चार चांदण्या देतो.
*****

अवांतरः चित्रपटाचा परिणाम म्हणून फंपुर्ण लेखात 'फ' हा 'फ' अफा टंकण्यात आलाय.

-(चित्रपट प्रेमी) अनामिक