Thursday, August 20, 2009

आठवणीतला पोळा

फोटो जालावरून साभार


आज श्रावणी अमावस्या, म्हणजे पोळा. घरच्या बैलांची पुजा करून त्यांच्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस. महाराष्ट्रातल्या संपुर्ण ग्रामीण भागात आजही आनंदाने साजरा होणारा सण. हा सण येतोही अगदी श्रावण महिण्याच्या शेवटी, जेव्हा शेतातली पेरणीची कामे संपलेली असतात. शेतकर्‍याच्या डोक्यावरचा भार बैलांच्या मदतीने पुर्ण हलका झालेला असतो. बैलांचे हे उपकार ह्या एका दिवसाच्या पुजेने थोडेच फिटणार आहेत? तरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रकार मला अगदी भावतो. प्रत्येक शेतकरी सच्च्या दिलाने हा सण साजरा करतो. लहानपणापासूनच मला या सणाचं विशेष आकर्षण वाटत आलं आहे. माझ्या पोळ्याबद्दलच्या आठवणीही तशाच आहेत.

आमच्या घरी आजोबांची बर्‍यापैकी शेती होती(/आहे). पण पोळ्याचा सण हा आम्ही सध्या जिथे राहतो त्याच गावी, म्हणजे उमरखेडमधेच (विदर्भात आहे) साजरा करत असू. खरंतर उमरखेड हे माझं आजोळ म्हणायला हवं. माझे बाबा इथे व्यवसायाकरता आले. मामाची उमरखेड मधेच शेती आहे, शेतात दोन बैलजोड्याही आहेत. त्यामुळे शिकण्यासाठी गावाबाहेर पडेपर्यंत पोळा अगदी उत्साहात साजरा केलाय. सगळ्या शेतकर्‍यांची जशी होते तशीच मामाकडेही पोळ्याची तयारी दोन-चार दिवस आधीपासूनच सुरु व्हायची. मागल्या वर्षी कुठेतरी घड्या करून ठेवलेले झूल संदुका, कपाटातून बाहेर यायचे आणि नीट झटकून बाहेर अंगणात उन खायला ठेवलेले असायचे. सोबतच बाशींगे, गोंडे, तुरे, इ. सामानही कपाटतून बाहेर यायचं. सगळं सामान व्यवस्थीत वापरण्याजोगं आहे की नाही याची खातरजमा व्हायची. बैलांची शिंगे रंगवायला ऑईलपेंटचा डबा, ब्रश, आणि बेगडही खरेदी करून झालेलं असायचं. मी ही सगळी तयारी स्वतः कधीच केली नाही, पण पोळ्याच्या एक दिवस आधी मामाकडे गेलं की सगळं तयार दिसायचं.

आमच्या भागात पोळ्याचा अधीच्या दिवसाला खांदमळनाचा दिवस म्हणतात. ह्या दिवशी सायंकाळी शेतातला गडी घरी बैल घेऊन यायचा. त्यांची पुजा करण्याआधी बैलांच्या खांद्यावर भिजवलेली हळद लावली जायची. मला हा प्रकार म्हणजे नवर्‍या मुला/मुलीला लग्नाच्यावेळी हळद लावण्याचा जो प्रकार आहे तसाच वाटायचा. हळद लावून झाली की बैलांची पाय धुवून पुजा आणि आरती केली जायची. त्यांच्या कानात दुसर्‍या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी घरी येऊन सण साजरा करण्याचं आमंत्रण दिलं जायचं. सगळ्यांची जेवणं झाली की गडी बैलांना घेऊन परत शेतात जायचा.

पोळ्याच्या दिवशी गावात सगळीकडेच फार गडबड असायची. घरी दारांवर आंब्याच्या पानांची तोरणं लावली जायची. घराच्या प्रवेशदाराच्या दोन्ही बाजूला पळसाच्या फांद्या, ज्याला 'मेढी' म्हणतात, उभ्या केल्या जायच्या (ह्या मेढीचं काय महत्व ते माहीत नाही). खर्‍याखुर्‍या बैलांसोबतच घरी मातीच्या बैलांचीही पुजा होत असे. त्यासाठी एक लाकडी पाट चुना आणि गेरूने रंगवला जायचा. त्यावर बैलांची मांडनी करून मग मी आणि दादा पुजा करत असू. हा प्रकार संपवून मी मामाकडे पोचेपर्यंत बैलांची अंघोळ घालून झालेली असायची. त्यानंतर मी आणि मामेभाऊ मिळून त्यांच्या शिंगांना रंग देत असू. रंग देताना ब्रश बैलांच्या अंगाला कुठे लागू नये याची काळजी घ्यावी लागे. शिंगांवरचा रंग वाळत आला की त्यावर बेगड लावायची. दुपारी ४ च्या सुमारास बैलांना अजून सजवायला सुरवात व्हायची. बाशिंगे, तुरे बैलांच्या कपाळावर चढवली जायची. पाठीवर झूल आणि पायात घुंगरू बांधले जायचे. मस्तं सजवलेले बैल खूपच दिमाखदार दिसायचे.

तयार झालेले बैल घेवून मारुतीचे मंदीर असलेल्या चौकात, म्हणजे पोळा भरायच्या ठिकाणी घेऊन जायचो. मंदिराभोवती एक प्रदक्षणा घालून बैलांना घेउन एका निश्चित ठिकाणी उभे रहायचे. शेकडो-हजारो लोक आपापल्या बैलजोड्या घेऊन या चौकात जमा व्हायचे. आम्ही भावंडं कोणते बैल किती सजले आणि कोणते खूप छान दिसताहेत हे बघत फिरायचो. तासेक भर फिरून होईस्तोवर गावच्या मानलेल्या पाटलाचे बैल पोळ्याच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात, वाजत गाजत यायचे. ह्यांच्या मंदिराभोवती प्रदक्षणा मारून झाल्या की सगळी कडे 'पोळा फुटला' ही बातमी क्षणात पसरायची. सगळीकडे एकच गोंधळ.... आपापल्या बैलांना घरी घेऊन जाण्यासाठी. घरी परतताना आम्ही भरपुर फुगे आणि लाडीलप्पे (पाण्याचे फुगे) खरेदी करून नेत असू. घरी आलो की बैलाची परत एकवेळ पुजा आरती केली जायची. पुरणपोळीच्या जेवणाने पोळ्याचा दिवस संपायचा.

पोळ्याचा दिवस संपला तरी लोकांचा उत्साह कमी होत नसे. दुसर्‍या दिवशी बैलांची वाजत गाजत मिरवणूक निघत असे. ह्या दिवसाला तन्हा पोळाही म्हणत. कारण ह्या दिवशी लहान मुले घरी पुजा केलेल्या मातीच्या बैलांना घरोघरी मिरवून आणत असत. कुणी ह्या मुलांना खाऊसाठी पैसे देत तर कुणी खरोखरचा खाऊ. कितीतरी खेडेगावात तर या दिवशी बैलगाड्यांच्या शर्यती लागतात म्हणे. असा पोळा साजरा करून आज बरीच वर्षे उलटलीत पण सगळं तस्संच्या तसं डोळ्यासमोर आहे. शहरी भागातल्या कितीतरी लोकांना पोळा भरणे, पोळा फुटणे हे प्रकार माहीतही नसतील. म्हणूनच माझ्या आठवणीतून आमच्या गावच्या पोळ्याची ओळख करून द्यायचा का खटाटोप.

पोळ्याच्या दिवशी सजवण्यात येणार्‍या बैलांवर लहान असताना आईने एक कविता शिकवली होती. मध्यंतरी ती विसरलो होतो, पण मग प्राजु ताईने ति कविता तिच्या यजमानांकडून मिळवून दिली होती... ति कवीता इथे देत आहे. ह्या कवितेसाठी
प्राजु ताई आणि तिच्या यजमानांचे खूप खूप धन्यवाद!

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार

राजा परधान्या, रतन दिवाण
वजीर पठाण, तुस्त मस्त

वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलाला गे

दुल दुलतात, कुणाची वशींडे
काही बांड खोंडे, अवखळ

कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
पिवळे तांबडे, शोभिवंत

वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा
सण बैल पोळा, ऐसा चाले

जरी मिरवीती, परि धन्या हाती
वेसणी असती, घट्ट पट्टा

झुलीच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले

आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर

सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मर मर, ओढायाचे.

काहीवेळा झुलीच्या खाली असलेले वळ जरी खरे असले तरी बहुतांशी शेतकर्‍याचे त्याच्या बैलांवर खरोखर प्रेम असते. ते त्यांची खूप काळजी घेताना दिसतात. त्यामुळे ह्या कवितेचा शेवट मला तितका आवडत नाही.

-अनामिक

1 comment:

onkardanke said...

खूप चांगली पोस्ट आहे.माझ्याही पोळ्यासंबंधीच्या आठवणी जाग्या झाल्या.आजकाल शहरी वातावरणात आणि शहरी बाबूंसोबत राहत असताना या आठवणी विरळ होत चालल्यात.सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तर या पोळ्याला एक वेगळीच काळी किनार आहे.खंगत चाललेली जनावरे आणि हताश डोळ्याचे शेतकरी हेच आज अनेक गावातल चित्र आहे.पोळ्याची पुरणपोळी खाताना हे सर्व आठवलं की पोळीतील गोडवाचं संपून जातो.