Thursday, December 31, 2009

टाटा २००९...

जवळ जवळ सगळ्या ब्लॉग्सवर २००९ ला निरोप आणि नववर्षाच्या शुभेच्छांचा सुळसुळाट झालाय. मी ठरवलंही होतं की आपण असं काही लिहायचं नाही , परंतू आताच अपर्णाचा ब्लॉग वाचला आणि मागे पडलेलं एक संपूर्ण वर्ष डोळ्यासमोरून गेलं. २००९ ने खूप खूप आनंदी क्षण दिलेत तर काही मोजकेच दु:खाचे क्षणही दिलेत... गोळाबेरीज करता २००९ खूप लकी ठरलं म्हणायला हरकत नाही.

तसं पाहीलं तर २००९ उजाडलं तेच एक प्रकारचं प्रेशर घेऊन. अमेरिकेत आलेली मंदीची लाट कित्येकांना त्यांची नोकरी राहील की नाही ह्या प्रश्नाने भेडसावत होती. खरंतर मला खूप भिती वाटायचं काही कारण नव्हतं. पण ह्यावेळी कंपनीज् समोर कंपनीत तुम्ही किती चांगलं काम करता ह्यापेक्षा कंपनी खरंच तुम्हाला (आणि कंपनीतल्या तुमच्या सारख्या अनेकांना) अफोर्ड करू शकते का हा प्रश्न होता. त्यामुळे अश्या काळजी वाहणार्‍या कित्येकात मी पण होतो. पण म्हणतात ना 'तो' वर बसलेला सगळं बघतो, त्याला माहीत असतं प्रत्येकाला काय, किती, आणि कधी द्यायचंय ते. मग 'फिकर कायको करने का?' असं म्हणून, त्याच्यावर सगळं सोपवून मोकळा झालो, आणि २००९ अगदी मजेत गेलं.

मला माझ्या जवळच्या मित्रांना भेटायला, त्यांच्याबरोबर हुंदडायला खूप आवडतं. म्हणूनच चान्स मिळेल तेव्हा मी त्यांना भेटायला जातो. २००९ मधे हे मैत्र्यसुख खूप अनुभवलं. मित्रांबरोबरचा वॅलन्टाईन्स डे, दुसर्‍या एका जवळच्या मित्राचा बर्थडे, काही मित्रांचे ग्रॅज्युएशन सेरेमोनी, स्मोकी माऊंटनस् ची १२ मित्र मैत्रिणींनी मिळून केलेली अ‍ॅडव्हंचरस आणि अविस्मरणिय ट्रिप, न्यु ओरलेन्सला मित्राकडे मस्तंपैकी आरास करून बसवलेला गणपती, त्याच मित्राने मागच्या महिन्यात घर घेतलं तेव्हा मुव्हींग करताना केलेली धावपळ... सगळं सगळं आनंद देणारं होतं. तसेच ऑफिसातली लोकसंख्या यावर्षी कमी झाल्याने वर्क लोडही जास्तं होतं, पण प्रेशर मधे काम करण्यातही खूप मजा आली.

वरच्या सगळ्या गोष्टींवर कोटी म्हणजे, दिवाळीत केलेली भारतवारी! तब्बल ७ वर्षानंतर मी दिवाळीत घरी होतो. अभ्यंग स्नानापासून ते औक्षण, फराळ, भाऊबीज सगळं अगदी मस्तं एंजॉय केलं. जवळ जवळ दोन वर्षाने आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो. आईची बोटं केसांमधून फिरली आणि वाटलं 'सुख याहून काय वेगळं असतं का?' भारतातले तिन आठवडे खूप लवकर संपले. काय नाही केलं या तिन आठवड्यात. दिवाळी झाली, नागपूरमधे मी आणि दादाने मिळून घर घेतलं. आणि अजून एक महत्वाची गोष्टं म्हणजे या सगळ्या धावपळीत माझी 'विकेट पडली'.

एक सांगायचं तर राहूनच गेलं... मागच्या वर्षी आजच्याच दिवशी मी इथे लिहायला सुरवात केली. खरंतर वर्षभरात खूप काही लिहिलं नाही, आणि खूप कोणाला मी लिहतोयं ते सांगीतलंही नाही (वेल, इथं जे लिहित होतो ते मिसळपाववर पण टाकत होतो). असं असताना सुद्धा मागच्या काही पोस्ट्सवर काहीजणांनी चांगले कॉमेंट्स दिले आणि आता लिहिण्याचा अजून हुरूप आलायं (थँक्स अपर्णा, कांचन, महेंद्रकाका, अजय आणि इतर). २००९ खरोखर छान गेलं, त्याला टाटा म्हणवत नाहीये. पण ते थांबणार थोडंच आहे. २००९ तु माझ्यासाठी खूप लकी होतास, म्हणून इच्छा नसतानाही २००९ तुला निरोप देतोय. २०१० सुद्धा तुझ्यासारखंच असेल अशी अपेक्षा करतोय!

तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा! हे नवे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ...

-अनामिक

Wednesday, December 23, 2009

टॅग अलाँग...

पहिलेच सांगतो की मला कुणीच टॅग केलेलं नाही. वेल, तसंही म्हणता येणार नाही कारण 'सहजच'ने लिहून ठेवलंय की जे जे राहीलेत त्यांना ती टॅग करतेय. खरं सांगू का? हा टॅगा टॅगीचा खेळ पाहिला आणि मन भूतकाळात गेलं... कॉलेज संपताना मित्र-मैत्रिणींचे भरलेले स्लॅमबुकं आणि डायर्‍या आठवल्या... आणि परत तो खेळ खेळ खेळावासा वाटला... म्हणून कोणी टॅगलेलं नसतानाही, माझी या खेळात थोडी भर.

1.Where is your cell phone?
इथंच, पडलाय निवांत माझ्या बाजूला. कालच याच्याबद्दल पोस्ट टाकलं म्हणून स्वारी खुश आहे!

2.Your hair?
थोडे थोडे पांढरे व्हायला लागलेत. मागे कुणीतरी म्हणालं होतं की हुशार लोकांचे केस लवकर पांढरे होतात म्हणून... तसं असतं तर माझे केस याआधीच आणि आहेत त्याहून जास्त पांढरे व्हायला हवे होते.

3.Your mother?
खूप साधी, खूप प्रेमळ...

4.Your father?
थोडे तापट वाटतात, पण हळवे आणि प्रेमळ

5.Your favorite फूड
सध्या तरी स्वतः करून खात असल्याने, जे काही आयतं मिळेल ते...

6.Your dream last night?
स्वप्नं क्वचितच पडतात.... कधी कधी कलर तर कधी कधी ब्लॅक अँड व्हाईट स्वप्नं! आहे की नाही गम्मत?

7.Your favorite drink?
आलं वेलची घातलेला चहा.

8.Your dream/goal?
ओह माय गॉड, इट्स हर...

9.What room are you in?
बेडरूम

10.Your hobby?
मित्रांबरोबर भटकायला जाणे... गप्पा मारणे, मुव्हीज बघणे

11.Your fear?
काकाकडे उन्हाळ्यात सुट्टीसाठी जायचो त्यावेळी रात्री गच्चीवर झोपायचो सगळे.... अंगणातल्या नारळाच्या झाडावरच्या 'ठक-ठक'ची (रा़क्षस, भूत, काय का असेना) अजूनही भिती वाटते.

12.Where do you want to be in 6 years?
भारतात.

13.Where were you last night?
फिजीकली इथंच बेडरूम मधे, पण मन मात्र कुठंतरी भटकायला गेलं होतं.

14.Something that you aren’t?
फेक. म्हणजे तोंडावर एक आणि पाठ फिरली की एक असं नाही माझं.

15.Muffins?
हो तर... बनाना नट मफीन आवडतं मला.

16.Wish list item?
कॅनन किंवा निकॉनचा एस.एल्.आर कॅमेरा... सध्यातरी एवढंच.

17.Where did you grow up?
उमरखेड... विदर्भात आहे.

18.Last thing you did?
किचनचा ओटा साफ केला.

19.What are you wearing?
पायजामा आणि टी.

20.Your TV?
गराज सेलमधून उचललेला आहे.

21.Your pets?
नोप. घरी अजीबात नको.

22.Friends
भरपूर आहेत, मात्र अगदी जवळचे खूप थोडे.

23.Your life?
चाललंय निवांत!

24.Your mood?
फ्रेश

25.Missing someone?
हो तर... घरच्या सगळ्यांना मिस करतोय.

26.Vehicle?
होन्डा अ‍ॅकॉर्ड.

27.Something you’re wearing?
अरमानी कलोन.

28.Your favorite store?
एवढ्यात स्टार-बक्स.

Your favorite color?
ब्लॅक

29.When was the last time you laughed?
आताही हसतोय... एकेकाचा चेहराच असतो हसरा.

30.Last time you cried?
भारतातून इथं परत येताना... अगदी थोडंसं!

31.Your best friend?
खूप कमी आहेत, आणि जे आहेत त्यांना ते माहीत आहे.

32.One place that you go to over and over?
ऑफीस?

33.One person who emails me regularly?
रेगुलरली मेल करायला कोणाला वेळ आहे?

34.Favorite place to eat?
आयतं करून खाऊ घालणारा/री जिथे बोलवील ती जागा.
________

मी माझी पोस्ट जो कोणी वाचेल त्याला टॅग करतो. Let's tag along...

-अनामिक

Tuesday, December 22, 2009

मी आणि माझा फोन

अबे अभितक तु यही फोन युज कर रहा है, अब तो बदल ले... - एक मित्र

जरूरत क्या है? - मी

आज कल तो कितने सही सही मॉडेल्स मिलते है... कबतक वही डिब्बा युज करेगा... - एक मैत्रिण

वो सब ठिक है, पर मेरे लिये यही ठिक है. और ऑफिसका सेलभी है मेरे पास. - परत मी

पर वो भी तो डिब्बाही है.. तु आय फोन, या एल जी व्ह्यु क्यों नही लेता... या फिर ब्लॅकबेरी तो ले ही ले... - दुसरा मित्र

कितनी कंजुसी करेगा... नही तो हम सब काँट्री करके तुझे सेलफोन गिफ्ट करते है... - मित्रांपैकीच कुणीतरी

अरे लेकीन फोन किसलिये होता है? बात करनेके लिये ना? मेरा डिब्बा वो काम कर लेता है... मुझे नये फोन की जरूरत नही लगती.... और मेरा इसके साथ एक अटॅचमेंटसा हो गया है... - मी परत समजवायचा प्रयत्न करतो.

प्रत्येक दोन-तीन भेटीनंतर माझा सेलफोन हा आमच्या ग्रुपमधे (ज्यात मी सोडून अजून एकच मराठी आहे) हसण्याचा किंवा चर्चेचा विषय ठरलेला असतो. खरंतर सध्या बाजारात येणार्‍या नवीन सेलफोन्स आणि त्यात असलेल्या सुविधा बघता कदाचित माझे मित्र योग्यच सांगत असतील. पण खरोखर मला नव्या फोनची गरज वाटतच नाही. शिवाय माझी माझ्या फोनशी खरंच एक अटॅचमेंट झालीये, ज्यामुळे हा फोन टाकून नव्या फोनला खिशात (पक्षी आयुष्यात) जागा द्यायची इच्छाच होत नाही. आणि फोनचं मुख्य काय काम असतं हो? हव्या त्या वेळी हव्या त्या व्यक्तीशी बोलण्याचं माध्यम बनणे... बरोबर? माझा फोन हे काम अगदी चोखपणे बजावतो, मग त्याला बदलण्याची गरजच काय?

तसं पाहायला गेलं तर माझा सध्याचा फोन हा माझ्या आयुष्यातला दुसरा फोन. इथे अमेरिकेत आल्यावर जवळ जवळ ६-८ महिन्यांनी माझ्या पहिल्या फोनने, मोटोरोला व्ही-३००ने, माझ्या आयुष्यात प्रवेश केला. तळहातावर मावणार्‍या, अगदी पिटुकल्या, निळ्या रंगाच्या, फ्लॅप असलेल्या ह्या फोनने माझ्यावर तेव्हा चांगलीच भुरळ पाडली होती. पण नव्याचे नऊ दिवस प्रमाणे फोनच्या काँट्रॅक्टचे वर्ष संपता संपता ह्या फोनने त्रास द्यायला सुरवात केली. काँट्रॅक्टमधे असल्याने हा फोन मोबाईलसेवा देणार्‍या कंपनीकडून बदलूनही घेतला, पण त्यानेही ४ महिन्यातच आपली मान टाकली... आणि मला ह्या फोनचा तिथेच निरोप घ्यावा लागला. आता मला नवीन काँट्रॅ़क्ट करून नवीन फोन घेणे भाग होते, पण तो घेईस्तोवर काय? असा प्रश्न पडला. तेव्हा एका सीनियर मित्राने त्याचा स्पेयर फोन, सोनी-एरिकसन, मला वापरायला दिला. ते साल असेल २००५. मित्रांनो, हाच सोनी-एरिकसन, माझ्या आयुष्यातला दुसरा फोन, चार वर्षानंतर अजूनही माझ्या बरोबर आहे.

माझी ही 'सोनी' (म्हणजे माझा फोन) खूप खूप गुणी आहे. एवढ्या दिवसांपासून माझ्याजवळ असूनही कध्धी हिने मला त्रास दिला नाही. आजही हिच्याशी दररोज २-३ तास बोलूनही २-२ दिवस चार्ज करायला लागत नाही. कधीही कॉल ड्रॉप झाले नाहीत की कधी हिच्या (अंतर्गत) एंटीनाने रेंज धरसोड केली नाही. नाही म्हणायला हिच्या मागून आलेल्या आणि तिखट झालेल्या फोनने अनेकदा भुरळ पाडली... कधी कधी हिला सोडून दुसरीला जवळ करावेसेही वाटले. पण प्रत्य़क्ष्यात असं काही करू नाही शकलो. त्यामागे कारणही तसेच आहेत. दोन वर्षांपुर्वी रोलरकोस्टर राईडवरून खाली पडून ही हरवली... ज्याच्याकडे गेली त्याने हिला लॉस्ट अँड फाऊंड मधे जमा केली. तेथील लोकांनी ही माझीच आहे याची खात्री करून एका आठवड्याने सुखरूप माझ्याकडे पाठवली. त्यावेळी तिला सुखरूप बघून खूप आनंद झालेला. ह्या प्रसंगानंतर मी खूप काळजी घ्यायचा प्रयत्न केला. पण ही परत दोन वेळा हरवली आणि दोन्हीवेळा सुखरूप माझ्याकडे आली. हिच्यावर असलेली फ्रेंन्डस् ची रिंगटोन, म्हणजे "आय विल बी देअर फॉर यू" हे ती नुसती म्हणतच नाही तर त्या शब्दांना पाळते सुद्धा!

आज कितीतरी वेगवेगळ्या सुविधा असलेले फोनस् उपलब्ध आहेत. इंटरनेट, ऑनलाईन टिवी, जी.पी.एस सगळं सगळं ह्या फोनस् मधे उपलब्ध आहे. पण एवढं सगळं असून खरंच या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे का हे तपासून बघणे गरजेचे आहे. मी आधीच म्हंटल्याप्रमाणे मला तरी ह्या गोष्टी अनावश्यक वाटतात. शिवाय माझी माझ्या सोनीशी एक अटॅचमेंट आहे. छोटंस यंत्र असलं म्हणून काय झालं, हिला सोडायला जीव होत नाही. हिच्याकडे बघता कदाचित हिच मला लवकरच सोडून जाईल असे वाटते, पण तोपर्यंत माझ्या सोनीला मी सुद्धा "आय विल बी देअर फॉर यू" असेच म्हणेन...

ये रही मेरी 'सोनी'.....


अवांतरः फोनला हासू नये!

-अनामिक
(हा लेख मी याआधी मिसळपाववर पोस्टवला होता.)

Thursday, December 17, 2009

होतं असं कधी कधी...

मी अगदी लहान होतो तेव्हा बाबांबरोबर घडलेली गोष्टं (मी ऐकलेली). माझ्या दादाचं शाळेत नाव घालायचं होतं म्हणून बाबा गावातल्याच शाळेत गेले. तिथले कर्मचारी, शिक्षक तसे ओळखीचेच होते, त्यामुळे आधी गप्पा झाल्या आणि नंतर दादाच्या नाव नोंदणीचा फॉर्म भरायला घेतला. त्यात मुलांचं नाव काय असं विचारलं आणि बाबा गोंधळात पडले... घरी दादाला 'दादा'च म्हणत होते सगळे आणि त्यामुळे बाबा त्याचं नावंच विसरले होते... झाली का पंचाईत! सगळे कर्मचारी हसायला लागले.... नाव काही केल्या आठवेना... तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका. होतं असं कधी कधी!

_____________

मी नुकताच शाळेत (बालकवाडीत) जायला लागलो होतो. म्हणजे चार्-आठ दिवसच झाले असतील. एक दिवस घरचा नोकर मला सायकलवर शाळेत सोडत होता, तेवढ्यात घरापासून जवळच राहणार्‍या एका डॉक्टर काकांना आम्ही दिसलो. ते त्यांच्या मुलीला मोटरसायकलवर शाळेत सोडत होते. खरंतर तिची आणि माझी शाळा शेजारी शेजारी होती. पण त्या काकांना वाटले की आम्ही दोघे एकाच शाळेत (वर्गात) आहोत. तरी बरं मी माझी शाळा पास होताना मी त्यांना म्हंटलंही 'काका माझी शाळा, काका माझी शाळा'. पण त्यांना वाटलं मी समोर दिसणार्‍या शाळेबद्दल बोलतोंय, ते पण म्हणाले... 'हो बेटा, तुझी शाळा'... आणि मला त्या नवीन शाळेत सोडलं. मला काय, लहान होतो त्यामुळे नवीन शाळेत गेलो. सकाळीच नोकराला त्या काकांनी सांगितले होते, की काही काळजी करू नको मी या दोघांना दररोज सोडत जाईन आणि न्यायला पण येत जाईन. त्यामुळे पुढचे चार्-पाच दिवस मी काकांच्या कृपेने नवीन शाळेत जात होतो. त्या नवीन शाळेतल्या बाईंना शेवटी कळालंच की मी त्यांच्या शाळेत नाव न नोंदवताच जात आहे. त्यांनी चौकशी केली मी कुणाचा आहे याची आणि म्हणाल्या की उद्या बाबांना शाळेत घेऊन ये. मी घरी येतो तर घरी माझ्या खर्‍या शाळेतून निरोप आलेला होता की मी शाळेत येतच नाहीये आणि मी सांगत होतो की उद्या शाळेत बोलावलंय. घरचे गोंधळात! शेवटी रात्री डॉ. काकांना विचारल्यावर उलगडा झाला की मी दुसर्‍याच शाळेत जात आहे म्हणून!

_____________

अजून एक अशीच ऐकलेली गोष्टं. ताई चार एक वर्षाची असेल (मी तेव्हा जन्मलोही नव्हतो). आई-बाबा तेव्हा साकळेंच्या वाड्यात भाड्याने रहायचे. शेजारी बरीच बिर्‍हाडं होती, त्यामुळे ताई नेहमीच कुणाकडेतरी खेळायला जायची. प्रत्येकवेळी विचारल्याशिवाय आई कुणालाच ताईला घेऊन जाऊ देत नसे. पण एक दिवस कुणी घेऊन गेलं नाही तरी ताई घरातून गायब झाली. आईला सुरवातीला वाटलं बाजूच्याच घरी असेल, पण मग विचारलं तर ति तिथे नव्हतीच. मग शेजारी पाजारी सगळीकडे विचारून झालं. कुणाकडेच नव्हती ताई. मग मामाकडे पाठवलं एकाला की तिथे नेलंय का कोणी म्हणून विचारयला, पण तिथेही नव्हती ताई. एक आजोबा नेहमी ताईला ते स्वतः फेरफटका मारायला जाताना घेऊन जायचे. त्यांनाही विचारून झालं. पण ताईचा कुठेच पत्ता नव्हता. आता आई चांगलीच घाबरली. बाबांना दुकानत निरोप गेला. बाबा तातडीने घरी आले. परत सगळ्यांची शोधाशोध सुरू. दोन एक तासानंतर पोलीसात जायचा निर्णय घेत होते, त्याच वेळी आजोबांना खोलीतल्या कोपर्‍यात ठेवलेल्या सुटकेसमधे काहीतरी हालचाल जाणवली. आजोबा आईला म्हणाले चेक कर, उंदीर असेल. आईने सुटकेस उघडली तर ताईसाहेब आत घामाघूम, पण निवांत झोपलेल्या आढळल्या. आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

______________

आमच्या शाळेत पोटे सर म्हणून मुख्याध्यापक होते. आणि पोटे बाई म्हणजे त्याच्या पत्नीसुद्धा शाळेतच शि़क्षिका होत्या. अर्थातच ते दोघे सरांच्या गाडीवर सोबतच शाळेत यायचे. एक दिवस शाळेत येताना चौकात ते कशासाठीतरी थांबले असावे. कामा संपल्यावर पोटेसरांनी गाडी सुरू केली, बाईंना बसायला सांगितलं. बाई बसता असतानाच त्यांनी गाडी चालवायला सुरवात केली... बाई जागेवरच पडल्या, पण सर आपल्याच तंद्रीत पुढे निघून गेले. इकडे बाई 'अहो मी पडले, अहो मी पडले' म्हणून ओरडत होत्या. सरांना मात्र बाई गाडीवर नाहीत हे शाळेत गेल्यावर कळालं. बाई कुठे गेल्या हे बघण्यासाठी ते तसेच परतले तर बाई सायकल-रिक्षातून शाळेत येत होत्या. हा किस्सा गावात येवढा फेमस झाला की शाळेतली काही कार्टी बाई किंवा सर रस्त्यात कुठे दिसले की लपून बसत आणि 'अहो मी पडले, अहो मी पडले' असे त्यांना चिडवत.

_____________

मी आठवी नववीत असेल. मराठीचा तास सुरु होता. बाई धडा वाचत होत्या. त्यात कोण्यातरी गरीब मुलांची कहाणी होती, आणि त्यांना कशी फक्तं कधीकाळी पुरणपोळी खायला मिळायची त्याबद्दल लिहिलेलं होतं. मी आपल्याच तंद्रीत होतो बहुतेक. मी ते चुकून 'कधी कधी काळी पुरणपोळी खायला मिळायची' असं वाचलं. परिच्छेद वाचून झाल्यावर माझा हात वर बघून बाईं 'काय?' म्हणाल्या तसं मी काळी पुरणपोळी कशी असते असं विचारलं आणि त्यानंतर वर्गात एकच हशा पिकला. लक्ष न दिल्याने मला फारचं लाजल्या सारखं झालं. मी हि गोष्टं विसरूनपण गेलो. बाईपण 'मी' असं विचारलं होतं हे विसरून गेल्या असाव्यात. त्यानंतर काही दिवसांनी बाई आणि माझी आई कुठल्यातरी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून होत्या. त्या दोघींची चांगली मैत्री असल्याने बाईंनी बोलण्याच्या ओघात मुलं कसा गोंधळ घालतात आणि वाचताना शब्दांची कशी चिरफाड करतात ते 'काळ्या पुरणपोळी'च्या उदाहरणासकट सांगितलं (पण त्यांनी मीच तो घोळ घालणारा असं सांगितलं नाही). काही दिवसांनी घरी काहीतरी होतं म्हणून मामाकडचे सगळे आणि काही जवळचे लोक जमले होते. जेवणे आटोपल्यावर सगळेजण हॉलमधे गप्पा मारत होतो तेव्हा आईने मुलं कशी वेंधळी असतात ते सांगताना बाईंनी सांगितलेलं उदाहरण सगळ्यांना सांगितलं आणि वरून 'अशी कशी बाई आजकालची मुलं, नीट वाचतही नाहीत' असा शेरा मारला. मी हळूच म्हणालो 'आई तो मुलगा मीच', तेव्हा आईने कपाळावर हात मारून घेतला.

_______________

इंजिनियरींग कॉलेजात असताना कॉलेजच्या आवारातच कॉलेजच्या प्रिन्सिपॉलला राहण्यासाठी एक बंगला होता. एका प्रोफेसरांनी एक दिवस शेवटचं लेक्चर जरा जास्तंच लांबवलं. संध्याकाळ होत आली होती आणि आम्ही मित्रमैत्रीणी गप्पामारत कॉलेजच्या बसस्टॉपकडे जात होतो. जाताजाता त्या प्रिन्सिपॉलच्या बंगल्या बाहेर एक माणूस पायजामा, बनियन घालून गवत साफ करत होता. तेवढ्यात एक मैत्रिण म्हणाली...'इस आदमी को पेहले भी कंही देखा है'... आम्ही सगळे त्याच्याकडे बघायला लागलो आणि सगळ्यांनाच वाटलं की खरच या माणसाला आपण पहिले कुठेतरी पाहिलं आहे. तेवढ्यात एका मित्राच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि तो म्हणाला 'अबे ये तो अपने प्रिन्सि है'... आणि सगळेच हसायला लागलो. नेहमी अगदी कडक इस्त्रीच्या कपड्यात राहणार्‍या प्रिन्सिला पायजामा, बनियनमधे बघून असं झालं होतं. होतं असं कधी कधी.

_______________

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे मी भारतातून परत इथं आल्यापासून अगदी वेधंळ्यागत वागतोय. आपल्याच तंद्रीत असतो एवढ्यात. मागच्या एका महिण्यातल्याच गोष्टी. एक दिवस सकाळी ऑफिससाठी ट्रेनमधे बसलो तर ऑफिसच्या स्टेशन नंतर दोन स्टेशन गेल्यावर लक्षात आलं. बर परत येताना तरी नीट उतरावं की नाही... पण नाही, परततानापण मी ऑफिसच्या नंतरच्या स्टेशनवर उतरलो. ऑफिसला पोचायला फारच उशीर झाला त्या दिवशी! एक दिवस घरी परतल्यावर सूप बनवलं... अर्धं बाऊलमधे घेतलं आणि परत भांड गॅसवर ठेऊन बेडरूमधे येऊन बसलो. कितीतरी वेळाने किचनमधे गेलो तेव्हा लक्षात आलं की गॅस बंद केलाच नव्हता. त्या सूपचं पिठलं झालं होत आणि भांड खालून जळालं होतं. मागच्याच आठवड्यातली गोष्टं, कॉफी गरम करायला मायक्रोवेव्ह ऐवजी फ्रिजमधे ठेवली आणि टायमर साठी बटण दाबायला गेलो तेव्हा लक्षात आलं! आणि परवाच सकाळी ऑफिसला निघताना लावलेला टिव्ही ऑफिसमधून घरी गेल्यावर बंद केला. म्हणायला छोट्या छोट्या गोष्टी, पण हल्ली जरा जास्तंत होतंय. कधी अनावधानाने, कधी आपल्याच तंद्रीत असल्याने, तर कधी वेंधळेपणाने असं होत असावं... तुमच्या सोबतही होतं का असं कधी कधी?

-अनामिक