Wednesday, May 27, 2009

आठवणींचा पाऊस

बाविसाव्या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसातून आज बाहेर बघताना खूप काळे ढग जमलेले दिसताहेत. तसं ऍटलांटामधलं वेदर फारच अनिश्चित असतं, आणि एवढ्यात तर ऊन आणि पाऊस अगदी पाठशिवणीचा खेळ खेळताहेत. पण आज न जाणो का खिडकीतून बाहेर जमलेले ढग बघताना मनातही आठवणींचे ढग जमून आले... खूप नॉस्टॅल्जीक वाटायला लागलं आणि मन कधी भूतकाळात गेलं ते कळलंच नाही. (भारतातही आता पावसाचं लवकरच आगमन होईल. वादळी पावसाने तर विदर्भात आधीच आपली वर्दी लावली आहे.)

मे महिन्याचा शेवट झाला आणि जूनच्या सुरवातीला मृग नक्षत्राच्या आसपास पावसाची चाहूल लागली की घरोघरी एकच प्रकार सुरू असतो .. छत्र्या माळ्यावरून खाली काढण्याचा. आमच्या कडेही काही अगदी वेगळं नव्हतं, जून सुरू झाला आणि शाळा सुरू होणार म्हंटलं की आम्हीही आमच्या छत्र्या बेडरूममधल्या सज्जावरून खाली काढायचो. बाहेर अंगणात नेऊन व्यवस्थित झटकून त्या व्यवस्थित आहे की नाही ते बघायचो. त्यात एक ना दोन छत्र्यांची एकतरी काडी तुटलेली असायची, किंवा बटणतरी बिघडलेलं असायचं, एखादीचं कापड मधेच कुठेतरी अडकून फाटलेलं असायचं, किंवा एखादी नीट बंद होत नसायची. हे सगळं मागच्या वर्षी पावसाळा संपतानाच झालेलं असायचं. पण आता कुठे पाऊस पडतोय, अन पडला तरी वापरू अशीच असं म्हणून तो पावसाळा त्या बिघडलेल्या छत्रीवरच काढला जायचा... पुढच्या वर्षी नवीन छत्री घेऊ असं ठरवून! पण येणार्‍या पावसाळ्याच्या सुरवातीला एक काडीच तर तुटली आहे असा युक्तिवाद करून छत्र्या दुरुस्तं करायला लागायच्या. तसेच शाळेच्या नव्या वर्षाच्या सुरवातीला होणार्‍या वह्या-पुस्तकांच्या खर्चात छत्रीची भर कशाला अशी मध्यमवर्गीय समजूत घरच्यांची असायची, जी अगदी रास्तं होती (पण तेव्हा नव्हतं पटत हे). आम्हा भावंडांच्या छत्र्याही ठरलेल्या होत्या... बटणवाल्या, छोट्या आकाराच्या. बाबांची मात्र जुन्या पद्धतीची, अगदी मोठी, दोघंजण सहज मावणारी अन खाली यू आकाराचा दांडा असलेली. मला आठवतंय, माझ्या छत्रीचा दांडा माझ्या हातून तुटला होता आणि बिनदांड्याची छत्री शाळेत न्यायला (कसली कोण जाणे) लाज वाटायची. केव्हढा हट्ट केला होता मी नव्या छत्री साठी! तेव्हा ताईने तिची छत्री मला दिली आणि शाळेतले पुढचे दोनेक वर्ष ती स्वतः तुटक्या दांड्याची छत्री घेऊन जायची (तेव्हा असलेल्या परिस्थितीत बाबांवर साध्या छत्रीच्या खर्चाचाही बोजा नको असं तिचं मत कळायला मला थोडं मोठं व्हायला लागलं). असो, छत्र्या दुरुस्त झाल्या आणि नीट उघडता आणि बंद करता आल्या की एक मोठ्ठं काम झाल्यात जमा असायचं, आणि आता वाट बघितली जायची ती येणार्‍या पावसाची!

पाऊसही यायचा, कधी अगदीच लवकर तर कधी बराच उशीरा. पण पहिला पाऊस पडला की काय मस्तं वाटायचं. अगदी लहान होतो तेव्हाचंही आठवतंय. आमचं घर मुख्य रस्त्यापासून बरंच आत आहे. आणि मी लहान असताना घरापर्यंत जायला डांबरी रस्ताही नव्हता. घराच्या पुढे (कॉलनीमधे) खूप मोकळी जागा होती. शिवाय सगळी वसाहत शेतजमिनीवर झाल्याने चिखलही भरपूर व्हायचा. मोठ्या लोकांची आपली कुरकूर सुरू असायची. पण आम्हाला मात्र मोकळं मैदान, त्यात पावसाचं साचणारं पाणी खूप आवडायचं. त्या साचलेल्या डबक्यात धप्पाक्कन् एक पाय देऊन किंवा उडी मारून मिळणारा आनंद शब्दात व्यक्तं कसा करता येईल? एकदा तर खूप पाऊस झाला, घराबाहेरच्या मोकळ्या मैदानात पाणी अगदी गुडघ्या पर्यंत साचलं. वाहतं पाणी होतं ते... मला दम कुठला, मी आणि माझा मित्र अगदी अनवाणी पायाने त्या पाण्यात कितीतरी वेळी भटकलो. शेवटी थकून घरी येताना कपड्यांकडे लक्षं गेलं... घरी गेल्यावर काय झालं ते सांगायलाच नको!

पावसात एक गोष्टं व्हायची, रस्त्यावर भरपूर चिखल झालेला असायचा अन शाळेच्या रस्त्यावर एका विशिष्ट ठिकाणी, शाळेत जाणार्‍या मुलामुलींपैकी कोणाची तरी चप्पल चिखलात घसरून तो/ती चिखलात पडलेला असायचा. माझ्यावर कधी ही पाळी आली नाही, पण पडलेल्या मुलामुलींवर हसण्याचं सुखं मात्र भरपूर घेतलंय. कितीतरी मुलामुलींना पावसाळी दिवसात रस्त्यावरून कसं चालावं तेच माहीत नसतं. चिखल बघून, घसरड्या जागा बघून चालणे वेगळे, आणि भर रस्त्यावर (पातळ) चिखलात चालणे वेगळे. कितीतरी मुलं चपला घालून ह्या चिखलात फताक फताक आवाज करत चालतात, त्यामुळे त्या मुलांचा पार्श्वभाग शिंतोड्यांनी मस्तं भरला जातो. हे टाळायचं असेल तर चिखलात चालताना टाचेवर भर देऊन चालावे, पाऊल पुढे टाकतानाही टाचेवर भर दिला तर पाठीवर असे शिंतोडे उडत नाहीत! मी लहान असताना पावसात अजून एक फायदा होता... शाळेच्या वेळेत जोरदार पाऊस आला की छपरावर होणार्‍या पावसाच्या कर्कश्श आवाजात मास्तरांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहचायचाच नाही. मग त्या तासाला न शिकवता काहीतरी वेगळंच केलं जायचं. तसेच, घरी परत येताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून लिक झालेल्या ऑइल/पेट्रोलमुळे साचलेल्या पाण्यात तयार होणार्‍या चमकत्या सप्तरंगात स्वतःला हरवून टाकावं वाटायचं!

पावसाच्या साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या तयार करून न सोडलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. तो तर पावसाच्या दिवसातला छंदच असतो कित्येकांचा. पण ह्या दिवसात आम्ही कॉलनीतले मित्र अजून एक खेळ खेळायचो... "खुपसणी". आता नियम आठवत नाहीत, पण एका लोखंडी गजाचा तुकडा (म्हणजेच खुपसणी) एका विशिष्टं पद्धतीने पावसाने ओल्या झालेल्या जमिनीत खुपसेल असा फेकण्याचा काहीतरी प्रकार होता. कोणा एकावर राज्य असायचं आणि बाकीचे खुपसणी जमिनीत खुपसत पुढे जायचे. जिथे खुपसणी जमिनीत खुपसल्या गेली नाही तिथे तो मुलगा बाद व्हायचा. आणि सगळे बाद झालेल्या ठिकाणावरून राज्य असलेला मुलाला एका दमात लंगडत सुरवातीच्या ठिकाणी यायला लागायचं. मजा यायची पावसाने भिजलेल्या जमिनीत, आणि थंडगार वातावरणात खेळताना.

पावसामुळे अजून एक गोष्ट व्हायची... आमच्या घराच्या गच्चीच्या स्लॅबचा उतार नीट न काढल्याने गच्चीवरही जागोजाग पाणी साचायचं. हे पाणी स्लॅबमधे मुरून घरात आतल्या भागात ओल यायची. त्यामुळे पाऊस पडून थांबला की आम्ही भाऊ-बहीण गच्चीवर जाऊन पाणी पायाने बाहेर काढायचो. मी लहान असतानाचे दिवस म्हणजे दूरदर्शनचे दिवस. पाऊस पडून गेला की पावसामुळे म्हणा किंवा वार्‍यामुळे म्हणा एंटीना हालायचा आणि टीव्हीवर फक्तं मुंग्या दिसायच्या. आम्हा तिघांपैकी मग एकजण एंटीना हालवायचं काम करायचा, एकजण गच्चीच्या कडेला आणि तिसरा खाली खिडकीपाशी असायचा. मग थोडं उजवीकडे, थोडं डावीकडे असं ओरडत टीव्हीवरच्या मुंग्या कमी झाल्या की परत सगळे घरात. पावसाळ्यात हा प्रकार नेहमीचाच!

या दिवसात टीव्हीवर मुंग्या यायच्याच, पण सर्वत्र अन्य प्राण्यांची संख्याही वाढायची. ह्या अन्य-प्राण्यात पहिला नंबर लागतो तो बेडकांचा. चिखल आणि भरपूर साचलेलं पाणी असलं की बेडूकही भरपूर व्हायचे. एरवी न दिसणारा हा प्राणी पाऊस पडला की लगेच एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या ताबडतोब कसा हजर होतो हे मला न सुटलेलं कोडं आहे. तसेच दिवसभर न ओरडणारे बेडूक रात्र झाल्यावरच का डराव डराव करतात हे दुसरं कोडं! (आमच्या घरचा संडास दिवसरात्र बंद असूनही, दरवर्षी एकदातरी तिथे एक बेडूक जाऊन बसलेलाच असायचा. अशा संकटसमयी त्या बेडकाला लवकरात लवकर बाहेर काढताना त्रेधा उडायची). बेडकांमध्ये काही बेडकांची त्वचा अगदी चोपडी असायची आणि त्यांचा रंगही वेगवेगळा आणि आकर्षक असायचा, तेवढच काय ते बेडकांबद्दल नवल वाटण्यासारखं! पावसात दिसणारा दुसरा प्राणी म्हणजे गोगलगाय. ह्या गोगलयींचेही तीन प्रकार आहेत. एक -शंख पाठीवर असलेली, दोन - लाल रंगाची, खूप पाय असलेली आणि शेकडोंच्या घोळक्याने दिसणारी, आणि तिसरी म्हणजे शेंबडी गोगलगाय. ही गोगलगाय माझी सगळ्यात नावडती... चपटी, लिबलिबीत आणि जिथून चालत गेली त्या जागेवर शेंबडा ट्रेल (मराठी शब्द) सोडणारी! पावसाळी दिवसात गांडूळही बर्‍याच प्रमाणात दिसायचे. आणि क्वचित निघणारा प्राणी म्हणजे साप! पाऊस पडून गेल्यावर आणि सगळीकडे हिरवेगार झाल्यावर दिसणार्‍या फुलपाखरांना आणि काजव्यांना विसरून कसं चालेल. लहानपणीचे कितीतरी दिवस ह्या फुलपाखरांच्या मागे धावण्यात आणि पकडण्यात गेलेत.

फुलपाखरांमागे धावता धावता दिवसही कसे भुर्र्कन उडून गेले ते कळलंच नाही. पहिला पाऊस, मातीचा सुगंध, रिमझीम पावसात प्यायलेला वाफाळता चहा किंवा खाल्लेली गरम गरम भजी, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवे हिरवे गार गालिचे तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे. पण एखादा दिवस असा येतो की बाहेर जमलेल्या काळ्या ढगांसारखं, मनातही आभाळ दाटून येतं आणि आठवणींचा पाऊस डोळ्यातून बरसू लागतो.

-अनामिक