Wednesday, December 31, 2008

स्लमडॉग मिलिनेअर

स्पॉइलर अलर्ट : चित्रपटातील कथानक ज्यांना माहीत करून घ्यायचे नाही त्यांनी लेख वाचण्याची तसदी घेउ नये.

झोपडपट्टीत राहणाऱ्या कोण्या एका चहावाल्या मुलाने 'कौन बनेगा करोडपती' मध्ये एक करोड रुपये जिंकलेत तर तुमचा विश्वास बसेल? नाही बसणार ना? वाटलंच! कारण काहीही असो, सामान्य माणसाच असामान्य कृत्य पाहून आपल्या मनात कौतुक नंतर, संशय पहिले येतो. कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय असं वाटतं. आणि असंच होतं स्लमडॉग मिलिनेअर या चित्रपटात. (या वीकएंडला पाहिला आणि खरंच खूप आवडला!!)

चित्रपटातला नायक जमाल मलिक कॉल सेंटरमध्ये चहावाल्याचं काम करत असतो. आणि मिळालेल्या संधीमुळे कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घेतो. आश्चर्य म्हणजे तो १ करोड रुपये जिंकतो सुद्धा (दोन लाईफ लाइन्सची मदत घेतो तो नाही म्हणायला). अनिल कपुरने शो होस्टची भूमिका छान वठवली आहे. स्वतःमुळेच शो एवढा प्रसिद्ध आहे आणि आणि आपल्याच शो वर अजून कुणी (तोही एक चहावाला) जास्त प्रसिद्धी मिळवतोय हे बघून अनिल कपुरचा इगो दुखावतो. एकवेळ तो जमालला माघार घेण्यास सुचवतो तर एकवेळ संधी साधून जमालला चुकीच्या उत्तराची हिंट देतो. पण दोन्हीवेळी जमाल स्वतःची बुद्धी वापरतो आणि १ करोड रुपयापर्यंत मजल गाठतो. चहावाल्याने एवढी मोठी रक्कम जिंकणे काय लहान गोष्ट नव्हे. चहावाला नक्कीच कायतरी चिटींग करत असणार म्हणून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात येते.

खरंतर 'कौन बनेगा करोडपती' चं कारण घेऊन दिग्दर्शकाने मुंबईतल्या झोपडपट्टीत जन्मलेल्या जमालचे आयुष्य अतिशय उत्तम रंगवले आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना जमालची रात्रभर कसून चौकशी केली जाते. इलेक्ट्रिक शॉकसुद्धा देऊन होतात. पण जिथे इंजिनिअर, डॉक्टर, प्रोफेसर सारख्या लोकांची मजल काही हजारांवर किंवा फार-फार तर काही लाखांपर्यंत जाते, तिथे एक अडाणी चहावाला १ करोड जिंकतोच कसे हा प्रश्न पोलिसांना सुटत नाही. शेवटी प्रामाणिक जमाल त्याला एकेका प्रश्नाचे उत्तर योगायोगाने का होइना पण आतापर्यंतच्या आयुष्यामुळे कसे माहीत याचे स्पष्टीकरण द्यायला लागतो, आणि प्रत्येक प्रश्नाच्या फ्लॅशबॅकमधून जमालचं बालपणापासूनचं आयुष्य चित्रपटात खुलायला लागतं.

लहानपणीच (म्हणजे ५-७ वर्षांचा असताना) दंग्यात आई मरते आणि जमाल व त्याचा मोठा भाऊ सलिम झोपडपट्टीवरून उकिरड्यावर येतात. तिथेच त्याची भेट त्याच्याच वयाच्या अनाथ लतिकाशी होते. मग तिघे वाट्याला येईल तसे उकिरड्यावरचे दिवस घालवत असतात. आणि एक दिवस अल्लाचा एक नेक बंदा त्यांना भेटतो व बरोबर घेऊन जातो. या अल्लाच्या नेक बंद्याचे इरादे अपंग बनवून भिकेला लावायचे आहे हे कळताच तिघेही त्यांच्या तावडीतून पळून जायच्या प्रयत्नात ट्रेनवर चढतात, पण बिचारी लतिका मागे पडते व त्यांची साथ सुटते. साथ सुटली तरी ति जमालच्या मनातून काही जात नाही, आणि तिला शोधायच्या अट्टहासाने दोघे भाऊ अनेकवर्षाने परत मुंबईत येतात. प्रयत्नांती लतिकाशी भेट तर होते पण तोपर्यंत तिला वेश्याबाजारात विकलेली असते. सलिमच्या मदतीने लतिका त्या बाजारातून सुटते खरी, पण आतापर्यंतच्या आयुष्यात आलेल्या अनुभवाने निष्ठुर झालेला सलिमच तिच्यावर आपला हक्क दाखवतो. आणि परत एकदा जमाल आणि लतिकाची ताटातूट होते.

मनाने उध्वस्थ झालेला जमाल नव्या आयुष्याची सुरवात करतो खरा, पण लतिका त्याच्या मनातून जात नाही. कॉल सेंटरमध्ये काम करत असताना त्याला सलिमचा शोध लागतो. दरम्यान सलिम एका नामी अंडरवर्ल्ड डॉनच्या हाताखाली काम करतो. आणि लतिकाच्या नशिबी त्या डॉनची ठेवलेली बाई म्हणून राहायची वेळ येते. जमालला सगळे कळते, पण त्याच्या मनातील तिच्याबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नसते. खरंतर कौन बनेगा करोडपतीवर येण्याचा त्याच्या उद्देश पैसे कमावणे हा नसून कदाचित लतिका आपल्याला बघेल आणि परत आपल्यापाशी येईल हा असतो.

कधी जमालच्या भूतकाळात नेणारा तर कधी वर्तमानात परत आणणारा 'स्लमडॉग मिलिनेअर' अप्रतिम चित्रपट आहे. दिग्दर्शक डॅनी बॉयेल यांनी जमालच्या आयुष्याचं अतिशय वास्तव चित्र उभं केलंय. चित्रपट कुठेच कंटाळवाणा वाटत नाही आणि प्रेक्षकांना अगदि शेवटचे गाणे संपेपर्यंत (क्रेडिट्स रोल होतानाचे 'जय हो')खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. देव पटेल, मधुर मित्तल, आणि फ्रेडा पिंटो तिघांनीही अनुक्रमे जमाल, सलिम, आणि लतिकाची भूमिका चांगली वठवली आहे. अनिल कपुर, इरफ़ान खान, आणि महेश मांजरेकर यांच जास्त काम नसलं तरी आपापल्या भूमिकेत योग्य वाटतात. ए. आर. रेहमाननं नेहमीप्रमाणेच उत्तम बॅकग्राउंड म्युझिक दिलंय. एकूण काय तर सगळा चित्रपट एकदा तरी आवर्जून पाहावा असा आहे.

काय मंडळी, मग कधी पाहताय हा चित्रपट?

अवांतर : चित्रपट पाहताना 'सलाम बॉम्बे'ची नक्कीच आठवण येईल.

(चित्रपट प्रेमी) अनामिक